काक्रंबा ग्रामपंचायतीचा गलथान कारभार उघड; घाणीच्या पाण्यातूनच नागरिकांचा प्रवास, सरपंच-ग्रामसेवक मौनात!
काक्रंबा प्रतिनिधी (प्रशांत गरड )
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील ग्रामपंचायतीचा निष्क्रिय, बेजबाबदार व लोकांच्या आरोग्याशी खेळणारा कारभार सध्या अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावातील स्वच्छतेचा प्रश्न पेटून उठला असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर परिसरात नाल्याचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः हैराण झाले आहे.
या घाणीच्या पाण्यातूनच महिला, वृद्ध, कामगार व शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत. दुर्गंधी, डासांचा सुळसुळाट आणि साचलेले सांडपाणी यामुळे परिसरात आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे आरोग्य थेट धोक्यात आले आहे. अपघात, घसरणे व संसर्गजन्य आजारांचा धोका असतानाही प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तोंडी तक्रारी करूनही केवळ आश्वासनांची मलमपट्टी करण्यात येत आहे. प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन घाणीची भयावह परिस्थिती दाखवली तरीही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एकीकडे शासन स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च करत असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे काक्रंबा गावात नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहणे ही बाब प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. योजना फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात घाणीचे साम्राज्य, अशीच स्थिती काक्रंबा ग्रामपंचायतीच्या कारभाराची असल्याची तीव्र टीका नागरिकांतून होत आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून, “नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना ग्रामपंचायतीला जाग येणार तरी कधी?” असा थेट सवाल आता विचारला जात आहे. सांडपाणी व्यवस्थापनाबाबत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही ग्रामस्थ देत आहेत.
⬛ चौकट ⬛
या संदर्भात सरपंच यांना अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष घाणीच्या साम्राज्यात नेऊन परिस्थिती दाखवली असतानाही ‘निधी शिल्लक नाही’ असे कारण पुढे करून काम टाळले जात आहे. सांडपाण्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा
दिपक भिसे, ग्रामस्थ – काक्रंबा यांनी दिला आहे.

