बामणीच्या विकासाला गती! अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ६० लक्षांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासह विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन व भूमिपूजन
धाराशिव प्रतिनिधी (राहुल कोळी )
धाराशिव तालुक्यातील बामणी गावाच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी देणारा ऐतिहासिक दिवस म्हणून या कार्यक्रमाची नोंद झाली. रु. ६० लक्ष निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामाचे उद्घाटन व भूमिपूजन माननीय अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या आरोग्य उपकेंद्रामुळे बामणीसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा गावातच उपलब्ध होणार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला भक्कम बळ मिळणार आहे.
याचवेळी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत रु. २० लक्ष निधीतून गावातील मुख्य रस्त्यावर पूल बांधकाम व सिमेंट रस्त्याच्या कामाचेही उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे गावातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार आहे. यासोबतच रोहिदास नगर येथे रु. १० लक्ष निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम, तसेच अहिल्यादेवी नगर येथे रु. १० लक्ष निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामाचेही उद्घाटन करून अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या विकासकामांमुळे बामणी गावाचा चेहरामोहरा बदलत असून आरोग्य, दळणवळण व नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. कार्यक्रमानंतर ग्रामस्थांसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा समजून घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. गावाच्या गरजांनुसार पुढील टप्प्यातील विकासकामांचे नियोजन केले जाईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली बामणी गावात सातत्याने विकासकामे सुरू असून, उर्वरित कामांसाठीही आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ठामपणे सांगण्यात आले. “विकासकामांसाठी निधी कधीच कमी पडू दिला जाणार नाही” ही स्पष्ट भूमिका मांडत बामणीच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आतापर्यंत मिळालेल्या निधीबद्दल आणि कामांच्या गुणवत्तेबद्दल माननीय दादांचे व अर्चनाताईंचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत विकासाला मत देऊन आपल्या उमेदवारांना भक्कम सहकार्य करण्याचे स्पष्ट आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री. अहमद पठाण, श्री. सुधीर भोसले, सरपंच गोदावरीताई शेळके, श्री. काकासाहेब शेळके, श्री. किरण बनसोडे, श्री. हनुमंत परीट, श्री. शंभू तोडकरी, श्री. भीमराव गायकवाड, श्री. दत्तात्रय पंडागळे, श्री. रामहरी माळी, श्री. महादेव मुळे, आशा कार्यकर्त्या, गावातील प्रमुख कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एकूणच अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनामुळे बामणीच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, येणाऱ्या काळात बामणी गाव आदर्श विकासाचे उदाहरण ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.


